V A Y E D A    B R O T H E R S

जीवनशैली 
वारली लोकांची जीवनशैली हि अतिशय साधी व निसर्गरम्य आहे. त्यांच्या गावांना आकर्षक बनवणारी अशी त्यांची सुंदर घरे निसर्गातूनच मिळणाऱ्या वस्तूंचा वापर करून बनवलेली असतात. त्यामध्ये कारवी, बांबू, विविध प्रकारच्या मातींचा, शेण व जंगलातून काही ठराविक झाडांपासून मिळणारे मजबूत व टिकाऊ लाकूड उदारणार्थ "साग आणि एैन" त्याच बरोबर झाडांच्या पानांचा मुख्यतः उपयोग केला जातो.घराचा पाया हा मुरूम-माती इतर मातीचे मिश्रण करून त्या मिश्रणाला घरामध्ये पसरवून चोपण्याने कठीण होई पर्यंत चोपून बनवले जाते. त्यानंतर त्या चोपलेल्या मातीच्या पायावर शेणाने सुंदर व आकर्षक रित्या सारवले जाते. घरांच्या भिंती ह्या कारवी, बांबू, माती व शेण यांचा उपयोग करून बनवल्या जातात. कारवी या वनस्पतीचा आतला भाग हा कापसा सारखा मऊ असल्या कारणाने हि वनस्पती खूप हलकी व जंगलातून घरी आणण्यास सोपी पडते. कारवी व बांबूची भिंत उभी करून त्या भिंतीला माती व शेणाचे मिश्रण तयार करून लीपले जाते. अशा ह्या भिंतीमुळे उन्हाळ्यात घरामध्ये थंडावा व थंडीत ऊब टिकून राहते. पूर्वीच्या काळी घरांची छतं हि सागाचे लाकूड व पानांनी विणलेली असायची पण आता त्यांची जागा कौलांनी घेतलेली आहे. असे हे वारली घर मुसळधार पावसाळ्यात सुद्धा सक्षमपणे उभे राहते. वारली घर हे नुसते माणसांसाठी नसून त्यांच्या पाळीव प्राण्यांचे सुद्धा आश्रय स्थान आहे. आणि त्यामुळेच त्यांचे घर हा त्यांच्या जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग आहे


वारली

जंगलाचे रहिवासी



वारलींचे जीवन हे मुख्यतः जंगलांवर अवलंबून आहे. पूर्वीच्या काळी लोक जंगलातून मिळणाऱ्या संसाधनांवर अवलंबून राहत होते. फळे, कंदमुळे त्याच बरोबर शिकार करणे, नदीतून मिळणारे मासे ह्या गोष्टींचा आहारामध्ये मुख्यतः वापर होतो. पण आजच्या बदलत्या काळामध्ये वारली हा एक शेतकरी व पृथ्वीवरील बदलते वातावरण व जंगलातून मिळणाऱ्या संसाधनांच्या अभावामुळे बदलत्या ॠतूंनुसार आपल्या परिवाराच्या उदार्निर्वाहासाठी मजुर म्हणून गावाबाहेर जाऊन काम करू लागला आहे.महाराष्ट्रात पावसाची सुरवात जुन महिन्यापासून होते, आणि तेव्हा वारलींच्या एका नवीन जीवन चक्राचा जन्म होतो. पावसाच्या आगमना बरोबरच शेतांमध्ये बियाण्यांची पेरणी सुरु होते. त्यानंतर पावसाच्या काही दिवसांनी "कोली खाणे" हा सन साजरा केला जातो. कोळी हि पावसाळ्याच्या सुरवातीला जंगलात उगवणारी एक पालेभाजी आहे. कोळी हि पालेभाजी धरतरी म्हणजेच धरतीमाते कडून मिळालेली एक अमूल्य भेट म्हणून जेवणात त्याचे सेवन केले जाते. कोळी खाण्या आधी घरातील वडिलधाऱ्या माणूसाकडून त्याची पारंपारिक रित्या दिवा लाऊन पूजा केली जाते. त्यानंतर आपल्या सहपरिवारा सोबत  बसून त्याचा आनंद घेतला जातो.


कोळी हा सण साजरा झाल्या नंतर सर्व लोक आपल्या शेतीच्या कामात खूप व्यस्त होऊन जातात. आपल्या शेतांमध्ये पुरेसे पाणी वाळणे, नको असलेले गवत कापणे, गुरांना चरायला नेणे आणि आपल्या शेतांची राखण करणे त्याच बरोबर तयार झलेल्या रोपांची रोपणी करणे. रोपणी करताना कुल्दैवतांचे स्मरण करून रोपणी केली जाते अशा विविध कामांचा त्यामध्ये समावेश होतो. शेतकऱ्यांच्या ह्या मेहनतीला हळूहळू निसर्गाचा प्रतिसाद मिळताच शेतातील पिक हे ताठ मानेने उभे राहून डोलायला लागते. पिकांना कणीस दिसू लागताच तारपा वाजवण्यास व गावांमध्ये गौरी नाच नाचायला सुरवात होते.  
ऑक्टोबर व नोव्हेंबर हा महिना शेतामध्ये तयार झालेले पिक कापण्याचा असतो. पण पिकांची कापणी आधी "सवरी" देवीची पूजा केली जाते. "सवरी" हि शेतावरील दैवत आहे जी आपल्या शेतांची रक्षा करते असे वारली लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून या दैवताला धन्यवाद म्हणून हि प्रथा पार पडली जाते. आणि त्या नंतर शेतातल्या पिकांची कापणी करण्यास सुरवात होते. कापणीनंतर दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळीच्या सणाला गावांमध्ये नाच-गाणी, खाणे-पिणे व भरपूर आनंद आणि उत्साह बघायला मिळतो.
गावांमध्ये विशिष्ठ ठिकाणी मोठमोठ्या झाडांच्या  सानिध्यात गावदेवाचे मंदिर असते. प्रत्येक वर्षीपिकांची कापणी झाल्यानंतर त्या मंदिरा मध्ये गावदेवाची पूजा केली जाते. गावदेवाच्या पूजेमध्ये "वाघ्यादेव"म्हणजेच वाघ-देवता, "कणसरी" म्हणजेच कणसांची देवता व त्याच बरोबर इतर देवी देवतांच्या सानिध्यात आजही हि पूजा मोठ्या उत्साहात पार पाडण्यात येते. गावदेवाची पूजा झाल्याचे गावांमध्ये
कळताच वारलीलोक नव खाण्यास सुरवात करतात. "नव खाणे" खाणे म्हणजे शेतातून मिळालेल्या नवीन धान्याची पूजा करूनते संपूर्ण परिवारा सोबत खाण्याचाआनंद लुटणे. त्यानंतर ते धान्य "कणगी" नामक बांम्बुने विणलेल्या पत्रातसाठवुण ठेवले जाते.

 मू 
वारली संस्कृतीचे मुळ इ.स.पुर्व २५०० ते ३००० ह्या काळापासून चालत आले आहे, असे मानले जाते.ह्या वारली जमातीच्या स्वतःच्या प्रथा, परंपरा, आणि आशावादी समजुती पिढ्यानपिढ्या आजही जपून ठेवलेल्या आहेत. त्याच बरोबर वारली लोकांनी आपल्या जीवनात हिंदू संस्कृती व समजुतींचा स्वीकार केला आहे असेही दिसून येते. वारली लोकांनी आपल्या चाली रिती व परंपरांचे नाते पुर्वी पासून धरती-मातेशी म्हणजेच निसर्गाशी जुळवून ठेवलेले आहे. त्याच बरोबर देवी देवतांची पूजा हि परंपरा सुद्धा मनापासून टिकवून ठेवलेली आहे. वारली समजुतीनुसार देवी-देवतांची पूजा हि शेती, निसर्ग व सृष्टी मधील प्रत्येक प्राण्यांच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे असा वारली लोकांचा समाज आहे. ह्यातून हे दिसून येते की वारली लोकांना धरती-मातेचा आणि निसर्गा पासून मिळणाऱ्या संसाधनांचा मनापासून आदर आहे.


विवाह पद्धती
वारली विवाह पद्धत हि अतिशय साधारण कमी खर्चिक पण खूप उत्साह व आनंदाने साजरी केली जाते. पावसाळयानंतर ची काम आटोपताच हिवाळ्याच्या अखेरीस व जानेवारी महिन्याच्या सुरवातीला वारली लोक लग्नाच्या तयारीला लागतात. लग्नाला लागणारी महत्वाच्या वस्तूंची खरेदी करायला घरातील परिवारासोबत गावातील मंडळींचा सुद्धा मनापासून समावेश असतो. हि खरेदी आठवड्यातून एकदा लागणाऱ्या गाव बाजारामध्ये केली जाते. तीन ते चार दिवस चालनाऱ्या ह्या सोहळ्यात अनेक पारंपारिक रिती व धार्मिक प्रथा यांचे दिवास रात्र पूजन करून वडिलधाऱ्या व्यक्ती व देवीदेवतांच्या आशीर्वादाने व मित्रा मंडळींच्या सोबतीने हा मंगलमय विवाह सोहळा अतिशय आनंदात पार पाडला जातो. त्याच दरम्यान होळी हा सण सुद्धा खूप जोमाने साजरा केला जातो. आणि त्याच बरोबर एका जीवन चक्राचा शेवट होतो.

​उन्हाळ्याच्या अखेरीस लोक राब तयार करून तो जाळण्याच्या तयारीला लागतात. "राब" हि शेता जवळपासची एक ठराविक जागा असते ज्या ठिकाणी पावसाळ्याच्या सुरवातीस पेरणी करून नवीन पिकासाठी रोप तयार केले जाते. गुरांचे जमा केलेले शेण, सुका पालापाचोळा आणि नको असलेला कचरा  ह्या जागेवर पसरवून जाळला जातो आणि त्याचे शेतासाठी सेंद्रिय खत म्हणून वापर केला जातो. आणि पुन्हा एका नवीन जीवन चक्राची सुरवात होते.


वारली 

वारली हि एक प्राचीन काळापासून आजपर्यंत जंगल व डोंगराळ प्रदेशात वास्तव्य करून राहत आलेली एक आदिवासी जमात आहे. महाराष्ट्र राज्यातील डहाणू व पालघर तालुका ह्या ठिकाणी आदिवासी लोकसंख्या फार मोठया प्रमाणात आढळून येते. त्यापैकीच एक वारली हि आदिवासी जमात आहे. वारली जमात मुख्यतः डहाणू, गंजाड, तलासरी, मोखाडा, वाडा, पालघर तसेच जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पसरलेली आहे. त्याच बरोबर मुंबई उत्तर सीमेपासून गुजरात सीमेवरील केंद्राशाषित प्रदेश दादरा नगर हवेली व दमण ह्या भागांमध्ये सुद्धा वारली लोकांचे वास्तव्य आढळून येते. वारली जमातीचे शेकडो वर्षापूर्वी उत्तरेकडून दक्षिणेकडे विस्थापन झाले असे अनेक इतिहास संशोधकांचे मत आहे