V A Y E D A  B R O T H E R S

© Mayur & Tushar vayeda  All rights reserved  I  2014 -2019

लग्नांमध्ये काढला जाणारा "चौक" हेच वारली चित्रकलेचे मूळ आहे. वारली समाजामध्ये पुर्वी पासून ते आज पर्यंत लग्नामध्ये "चौक" काढण्याची परंपरा आजही मोठया प्रमाणात बघायला मिळते. "चौक" हे एक प्रकारच्या मंदिराचे चित्र असून ते लग्ना सोहळ्यामध्ये घराच्या आतल्या भिंतीवर काढले जाते. चौकाचे दोन प्रकार आहेत एक "देवचौक" आणि दुसरा "लग्नचौक". लग्नचौकात "पालघाट" देवीची स्थापना करून लग्नाच्या वेळी त्याची पूजा केली जाते. चौक काढण्याचा मान हा "सवास्नी" म्हणजेच विवाहित महिलेचा असतो. गवताची किंवा बांबूची काडी आणि रंगा ऐवजी तांदळाच्या पीठचा रंग म्हणून वापर केला जातो. घराच्या भिंती ह्या शेण आणि मातीने लिपलेल्या असल्याने त्यावर गेरू किंवा लाल मातीने सारवून त्या भिंतीवर चौक काढला जातो. चौकाच्या आजूबाजूला लग्नामध्ये होणाऱ्या घडामोडींचे चित्र देखील काढले जाते. चौका व्यतिरिक्त घराच्या आतल्या भागात व समोरच्या भिंती वर देखील घराची सजावट म्हणून चित्रे काढली जातात. त्याच बरोबर पारंपरिक चालीरीती, पूर्वजांकडून ऐकलेल्या गोष्टीं, लोककथा आणि स्वतःच्या डोळ्याने निरीक्षण केलेल्या निसर्गाचे चित्रण केलेले असते.

© copyright @ vayeda.in


वारली जमाती व संस्कृती जितकी प्राचीन आहे वारली चित्रकला हि तितकीच प्राचीन आहे. संस्कृती, पारंपारिक रिती रिवाज आणि धार्मिक विश्वासासोबत हि कला देखील आजपर्यंत जपून ठेवलेली आहे. वारली चित्रकला हि वारली लोकांचे एक अतूट अंग आहे आणि आज संपूर्ण जगामध्ये वारली लोकांची ओळख हि वारली चित्रकलेतूनच झालेली आहे.

वारली चित्रकला काही सोप्या भौमितिक आकारांचा वापर करून रेखाटली जाते. त्यामध्ये त्रिकोण, वर्तुळ, चौकोन आणी सरळ व वाकडया तिकडया रेषा अशा आकारांचा वापर केला जातो. हे आकार निसर्गाच्या निरीक्षणातून आलेले आहेत. त्रिकोणी आकार हा डोंगरांच्या निरीक्षणातून आलेला आहे. वर्तुळाकार हा सूर्य आणि चंद्राच्या निरीक्षनातून आलेला आहे. सरळ व ओबडधोबड रेषांचे आकार हे सरळ झाड, वेली, नदया ह्यांच्या निरिक्षणातून आलेला आहे. आणि आजच्या काळात प्रगत झालेल्या गोष्टी म्हणजेच मोटारगाडी, पक्की घर, इमारती आणि औदयोगिक उपकरणांना वारली चित्रकलेत प्रदर्शित करण्यासाठी चौकोनी आकाराचा वापर केला जातो.   

 [ वारली चित्रकला परंपरा व संस्कृती  ]

वारली चित्रकला साधारण १० व्या शतकापासून सुरु झाली असावी असे तज्ञांचे मत आहे कारण त्या काळात अक्षरांची माहिती नसल्यामुळे चित्रांद्वारे आपले विचार त्यावेळची लोकं मांडत असावीत. पण नंतरच्या काळात हि कला लुप्त होऊन पुन्हा १७ व्या शतकात सुरु झाली.  पण अशीच चित्रे मध्य-प्रदेशातील भीमबेटका येथील गुफेमध्ये आजही पाहायला मिळतात. या गुफेमधल्या चित्रांमध्ये देखील माणसे, प्राणी, पक्षी व जनावरांच्या चित्रांनी रंगवली आहेत . काही तज्ञांच्या मते हि चित्रकला २५०० ते ३००० वर्षापूर्वी  सुरु झालेली आहे . वारली चित्रकलेत स्वतःच्या डोळ्याने बघितलेले क्षण, आपल्या पूर्वजांकडून ऐकलेल्या गोष्टींची, रोजच्या दिनक्रमाची व वारली संस्कृतीची चित्रे रेखाटली जातात. साधारण १९७० सालापासून वारली चित्रकलेची ओळख हि संपूर्ण जगभर होऊन आज अनेक वारली चित्रकार हि कला आपापल्या कल्पनेतून जगासमोर मांडत आहे. आणि आजच्या प्रगतणशील जगामध्ये वारली कला आजही आपल्याला ३००० वर्ष मागे घेऊन जाते.